स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून बेकायदा छोट्या सिलिंडरमध्ये भरणा करुन विक्री करणाऱ्या दोघांना सिंहगड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून लहान मोठे २८ सिलिंडर, वजन काटा, रेग्युलेटर, पाईप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आशिष अशोक मोरे (वय २७) अमर सूर्यकांत शेडोळे (वय २५, दोघे रा. धायरी, सिंहगड रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. धायरी परिसरात एका पत्र्याच्या खोलीत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून गॅस चोरी करण्यात येत असून, बेकायदा छोट्या सिलिंडरमध्ये भरणा करण्यात येत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी देवा चव्हाण यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी लहान मोठे २८ गॅस सिलिंडर, वजन काटा, रेग्युलेटर, पाइप जप्त केले.पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, गुन्हे शाखेचे निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, संजय शिंदे, उत्तम तारु, राजू वेगरे यांनी ही कारवाई केली.