पुणे : प्रत्येकात सुप्तशक्ती असते. त्याचा वापर करणे आणि ती जागरूक ठेवणे महत्त्वाचे असते. व्यक्तिगत प्रगतीसाठी नियोजन करणे गरजेचे असून त्या नियोजनात स्वयंशिस्तीला विशेष प्राधान्य हवे. स्वयंशिस्तीच्या मार्गाने व्यक्ती निश्चितपणे प्रगतीपथावर पाहोचते, असे प्रतिपादन बोरावके ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप बोरावके यांनी केले.
मराठवाडा मित्र मंडळाच्या व्यावसायिक अभ्यासक्रम विभागातील ‘मी कसा घडलो‘ या व्याख्यानमालेत ते बोलत होते. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव, प्राचार्य देविदास गोल्हार, उपप्राचार्य आर. आर. पंडित व्यासपीठावर उपस्थित होते.
व्यावसायिक अभ्यासक्रमाचे माजी विद्यार्थी आणि आज जे यशस्वी उद्योजक आहेत त्या संदीप देशपांडे, सुजाता जोगी–शिंदे, राहुल जाधव, सचिन शिंदे, समीर पठाण, शिवम साळवी, अथर्व जाधव व राजीव पुजारी यांचा सत्कार डॉ. दिलीप बोरावके यांच्या हस्ते करण्यात आला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोरावके म्हणाले, सचोटी, हातोटी, लिखोटी या तीन सूत्रांचा जीवनात उपयोग करता आला पाहिजे. आपल्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर भाषेवर प्रभुत्व हवे. म्हणून भरपूर वाचन करा. वाचनाने वेगळा आत्मविश्वास प्राप्त होतो, असे ते म्हणाले.
संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांनी अध्यक्षीय समारोप करताना ‘स्वतःला कमी लेखू नका. सतत प्रगतीचा ध्यास घ्या‘ असे आवाहन केले.
प्रास्ताविक प्राचार्य देवीदास गोल्हार केले. सूत्रसंचालन सुजाता शेणई यांनी तर आभार आर. आर. पंडित यांनी मानले.












