पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १८: स्वर-ज्ञान समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वर-ज्ञान संगीत समारोहात सुप्रसिद्ध ज्येष्ठ सितार व तबलावादक पंडित नयन घोष व युवा व्हायोलिन वादक तेजस उपाध्ये यांना पं. ज्ञानेश्वर पंडित स्मृती प्रथम ‘स्वर-ज्ञान’ पुरस्कार प्रदान करण्यात आला; तर ज्येष्ठ तबलावादक व गुरू पंडित विनायक फाटक यांचा पंच्याहत्तरीनिमित्त सत्कार करण्यात आला.
प्रसिद्ध शहनाई वादक कै. पं. ज्ञानेश्वर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त लोकमान्य सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात पुण्यातील युवा पिढीतील तबलावादक अनिरुद्ध पंडित यांच्या स्वतंत्र तबला वादनाने झाली. त्यांनी तीनतालमध्ये पेशकार, चलन तसेच दिल्ली, फरुखाबाद घराण्याचे कायदे, रेले यांचे बहारदार वादन सादर केले. या नंतर युवा पिढतील आश्वासक व्हायोलिन वादक तेजस उपाध्ये यांचे वादन झाले. त्यांना धनंजय पंडित यांनी समर्पक तबलासाथ केली.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ व्हायोलिन वादक व गुरू पं. अतुलकुमार उपाध्ये, गायनाचार्य पं. विकास कशाळकर, प्रसिद्ध गायक पं. आनंद भाटे व रवींद्र दुर्वे यांच्या हस्ते पं. ज्ञानेश्वर स्मृती प्रथम ‘स्वर-ज्ञान’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पं. विनायक फाटक यांचा अमृत महोत्सवानिमित्त मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
पं. घोष यांनी एकल तबला वादन व तबला साथसंगत याविषयी मौलिक मार्गदर्शन करून ईशान घोष यांच्यासह तबलावादन सादर केले. त्यांनी त्रिताल मधील पारंपरिक कायदे, रेले व गती सादर केल्या. युगल तबलावादनाला प्रतिक सिंग यांनी सुरेल लेहरा साथ केली.
कार्यक्रमाचे निवेदन मंगेश वाघमारे यांनी केले तर अवंती पंडित यांनी आभार मानले.












