रस्त्याच्या कडेला उघड्यावर बांधलेल्या हौदात बुडून सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हडपसर भागातील उरुळी देवाची येथे घडली आहे. अल्फाज इसाक शेख (वय ७) असे बुडून मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने, दुर्घटनेस जबाबदार असल्याबद्दल जागामालक, बांधकाम ठेकेदाराविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निसार वाहेदखान पठाण (वय ३२, उरुळी देवाची, सासवड रस्ता) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयंतीभाई लखीरामभाई सुतार (वय २९, रा. पिसोळी), महेश बबन कोंडे (वय ३६, रा. उरुळी देवाची) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पाण्याचा साठा करण्यासाठी सुतार यांनी उरुळी देवाची भागातील जागेत हौद बांधला होता. हा हौद सात फूट खोल असून हौदात सहा फुटापर्यंत पाणी होते. हौद रस्त्यालगत होता, तसेच त्या ठिकाणी रखवालदारही नव्हता. सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्यात आली नव्हती. शेजारी पठाण कुटुंबीय राहायला आलेले आहे. पठाण यांचा भाचा अल्फाज तेथे खेळत होता. खेळत खेळत तो हौदात पडल्याने बुडाला. अल्फाज बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.