पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.२२ : फ्लॅक्स व बॅनर लावणाऱ्या तरुणावर हप्ता न दिल्याने धारदार शस्त्राने वार करणाऱ्या टोळी प्रमुखासह तिघांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. ही घटना (दि.३१) जुलै रोजी घडली होती. अक्षयसिंग बिरसिंग जुन्नी (वय २२ रा.वैदवाडी, हडपसर (टोळी प्रमुख), कुलदीपसिंग ऊर्फ जोग्या चंदनसिंग जुन्नी (वय २१ रा. सदर),विशाल ऊर्फ मॅक्स किशोर पोरेबिया (वय २२ रा. हडपसर) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ५१ वी मोक्का कारवाई आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की सदर आरोपीने फ्लॅक्स व बॅनर लावण्याचे काम करणाऱ्या फिर्यादीला प्रत्येक महिन्याला हजार रुपये हप्ता द्यावे लागेल अशी धमकी दिली. त्यावर फिर्यादीने सध्या पैसे नसल्याचे कारण सांगितल्याने आरोपीने फिर्यादीचे दोन्ही हात पकडून तुला फार मस्ती आली आहे, तू कसा हप्ता देत नाही ते बघतो असे म्हणून फिर्यादीच्या डाव्या डोळ्यावर व छातीवर धारदार शस्त्राने वार केले होते.
या प्रकरणासह टोळी प्रमुख हा नवीन साथीदारांसह सदर परिसरात दहशत निर्माण करत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, घरफोडी,चोरी सारखे १४ गुन्हे हडपसर पोलीस स्थानकात दाखल आहेत.
सदर आरोपीं विरोधात भा.द.वि. कलाम ३०७,३८४,३२४,५०४,५०६,३४,महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलाम ३७ (१)१३५, क्रिमिनल लॉ.अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सह पोलीस आयुक्त हडपसर विभाग, अश्विनी राख करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परि- ५ विक्रांत देशमुख, सह पोलीस आयुक्त अश्विनी राख,वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक संदीप शिवले, सह पोलीस निरीक्षक सारिका जगताप, सह पोलीस निरीक्षक दीपक बर्गे, तसेच निगराणी पथकातील पोलीस आमदार प्रवीण शिंदे, महेश उबाळे, गिरीश एर्कोगे, अंकुश निकम, राकेश चव्हाण, खैरे यांनी केले आहे.












