पुणे : “हर घर तिरंगा 2.0” मोहिमेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा फडकवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन देशातील जनतेला केले आहे. यासाठी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत राष्ट्रध्वज पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी भारतीय टपाल विभागाकडे सोपवण्यात आली आहे.
माहितीनुसार, या मोहिमेचा एक भाग म्हणून पुणे शहर पूर्व टपाल विभागाने जनजागृतीसाठी दि. 11 ऑगस्ट रोजी बाईक रॅली काढण्यात आली. पुणे कॅम्प येथील महात्मा गांधी रोड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली. पुणे हेड पोस्ट ऑफिस (पुणे जीपीओ) येथे बाइक रॅलीचा समारोप झाला.
पुणे शहर पूर्व टपाल विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डॉ.अभिजित इचके यांच्या मार्गदर्शनाखाली ही बाइक रॅली काढण्यात आली. या रॅलीत टपाल विभागाचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. समारोपीय कार्यक्रमाला संबोधित करताना अधीक्षकांनी प्रत्येक नागरिकाने घरोघरी तिरंगा फडकवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.












