पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १० -: हातगाडी इथे का लावली याचा जाब विचारत मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली असून एका इसमाने तीन अनोळखी व्यक्तीं विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी हे विमाननगर येथील पंचशील बिसनेस पार्क समोरून आपली हातगाडी घेऊन घराकडे निघाले होते. त्यावेळी आरोपी यांनी मोटरसायकल वरून मागुन येऊन त्यांना अडवले. तु कोणाच्या सांगण्यावरून येथे हातगाडी लावतो, तुझी हातगाडी लगेच बंद करून घे नाहीतर तुला दाखवतो मी कोण आहे, तू इथे कसा धंदा करतो तेच बघतो अशी धमकी देत शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली आहे. तसेच हातगाडीवरील गल्ल्यातील ३००० रुपये हिसकावून घेत तेथे पार्क केलेल्या मोटार सायकलचे नुकसान केले आहे.
आरोपींवर भादवि कलम ३९२,३५२,४२७,५०४,५०६,३४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नसून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एम. चंदन हे करत आहेत.












