पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०४ : पत्नीच्या प्रियकराचा खून करून मृतदेह मुळशी धरणात टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली असून याप्रकरणी आरोपी पतीला (अक्षय भास्कर खिल्लारे वय २१, रा. बालेवाडी, मूळ रा. हिंगोली) हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.
किशोर प्रल्हाद पवार असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर रोजी किशोर पवार हे बेपत्ता असल्याची तक्रार हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल होती. त्याबाबत तपास करत असताना चौकशीत अक्षय खिल्लारे याचा पोलिसांना संशय आला. त्यावरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली.
त्यावेळी बेपत्ता असलेल्या किशोर याचा आपण खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. आरोपी अक्षय याच्या पत्नीसोबत मयत किशोर पवार याचे प्रेमसंबंध असल्याचा संशय अक्षय याला होता. त्यातून त्याने किशोर यांना जीवे मारण्याचा कट रचला. २४ सप्टेंबर रोजी त्याने किशोर यांना दुचाकीवरून सुसगाव येथून वारक गावात मुळशी धरणाच्या बाजूला नेले. तिथे लघुशंका करण्याच्या बहाण्याने थांबून सोबत आणलेल्या विळ्याने किशोर पवार यांच्या मानेवर, चेहऱ्यावर वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर किशोर यांचे हात-पाय बांधून मृतदेह वारक गावातील मुळशी धरणाच्या पाण्यात टाकला असल्याचे अक्षय याने तपासात सांगितले. यासंदर्भात हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.












