पुणे प्रतिनिधी
औंध : महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ, सामूहिक शिक्षणाचे पुरस्कर्ते व कमवा आणि शिका या तत्त्वज्ञानाची सुरुवात करून त्यांनी मागास जाती आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याच थोर महामानवाच्या १३६ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात (दि.२०) मूल्य शिक्षण आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने “कर्मवीर भाऊराव पाटील जीवन चरित्र – अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण आंधळे होते. कर्मवीर भाऊराव पाटील जीवन चरित्राचे अभिवाचन प्रा. डॉ. सविता पाटील, प्रा.डॉ. देवकी राठोड, प्रा.सायली गोसावी, प्रा.डॉ. रेश्मा दिवेकर व कार्यक्रमाचे प्रस्ताविक यांनी केले. तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी अवनी चव्हाण, साक्षी खवळे यांनी अभिवाचनात सहभाग घेतला.

“मूल्याच्या आधारावरच आपल्या जीवनाची संपूर्ण चौकट आधारलेली असते आणि म्हणून मूल्य शिक्षण महाविद्यालयात महत्वाचे असते”. असे कार्यक्रमात यावेळी बोलताना प्राचार्य अरुण आंधळे म्हणाले. तसेच सदर कार्यक्रमाच्या आयोजकांचे कौतुक केले. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन चरित्राचे अभिवाचन करणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची माहिती असावी तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जीवन चरित्र सर्वांना माहिती असावे, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख प्रा. प्रभंजन चव्हाण, प्रा. राजेंद्र रासकर, प्रा. रमेश रणदिवे, प्रा. कल्याणी सोनावणे, प्रा. स्वाती चव्हाण आदी उपस्थित होते.
महाविद्यालयात २० सप्टेंबर २०२३ ते २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ते खालील प्रमाणे –
गुरुवार (दि. २१ सप्टेंबर) – निबंध लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा.
शुक्रवार (२२ सप्टेंबर) – कर्मवीर चित्ररथ मिरवणूक.
शनिवार (दि. २३ सप्टेंबर) – वकृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा.
रविवार (दि. २४ सप्टेंबर) – रांगोळी स्पर्धा.
सोमवार (दि. २५ सप्टेंबर) – पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती समारंभ सप्ताह संपन्न होणार आहे.












