पुणे: पुणे धनकवडी येथील महावितरण उपविभाग कार्यालयमधील प्रशिक्षणार्थीला नवीन खरेदी केलेल्या फ्लॅटच्या पूर्वीच्या मालकाचे नाव बदलून नवीन नाव लावण्यासाठी ८०० रुपयांची लाच घेताना लाच लुच पथकाने रंगे हात अटक केली आहे. या बाबत सत्यता अशी कि; लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.
आशिष ज्ञानोबा क्षीरसागर (वय २५) असे या प्रशिक्षणार्थीचे नाव असून तक्रारदार यांनी त्यांच्या आईच्या नावावर एक फ्लॅट खरेदी केला होता. या फ्लॅटच्या लाईट बिलावरील पूर्वीच्या मालकाचे नाव बदलून त्यांच्या आईचे नाव लावण्यासाठी आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे महावितरणच्या ऑनलाईन साईटवर अपलोड करुन देण्यासाठी आशिष क्षीरसागर याने तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे १४ नोव्हेंबर रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी त्याच दिवशी करण्यात आली. त्यात क्षीरसागर याने ८०० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर मंगळवारी धनकवडी येथील महावितरण उपविभाग कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ८०० रुपये स्वीकारताना क्षीरसागर याला पकडण्यात आले. सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करुन क्षीरसागर याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे अधिक तपास करीत आहेत.