कर्नाटकातून पुण्याच्या दिशेने अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोमधून पोलिसांनी 70 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पुणे ग्रामीण पोलीस हद्दीत राजगड पोलिसांनी शुक्रवारी (दि. 26) ही कारवाई केली.
नामदेव मधुकर लवटे (28) व चेतन दत्तात्रय खांडेकर (19, दोघे रा. निजामपूर, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातून गुटखा भरून लाल रंगाचा आयशर टेम्पो पुण्याच्या दिशेने येत होता. हा टेम्पो राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येताच पोलिसांनी त्याला चौकशीसाठी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने टेम्पो न थांबवता पुण्याच्या दिशेने पळ काढला. त्यानंतर खेडशिवापूर टोलनाक्यावर पोलिसांनी वाहन अडवून त्यांना पकडले.
टेम्पो पकडल्यानंतर चौकशीत 70 लाख रुपये किंमतीचा विमल पानमसाला जप्त करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक करून टेम्पो जप्त केला.
नामदेव आणि चेतन यांच्यासह कर्नाटकातील विजापूर येथील रहिवासी शाकीर निसारअली मॅटी आणि कर्नाटकातील मंगोली, विजापूर येथील रहिवासी सद्दाम मेहबूब कोतवाल यांचाही समावेश होता.
या संदर्भात राजगड पोलिसांनी आयपीसी कलम 328, 188, 272, 273 आणि अन्न सुरक्षा कायदा 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राजगड पोलीस अधिक तपास करत आहेत.
कर्नाटकातून पुण्यात 70 लाख रुपयांचा अवैध गुटखा वाहतूक करणारा टेम्पो जप्त, दोघांना अटक












