पुणे प्रतिनिधी
पुणे दि.९ : यंदाचा गणेशोत्सव शांततेत व सुरळीतपणे तसेच उत्साहात पार पडावा यासाठी पुणे पोलिसांनी झोन-१ मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक उपस्थित राहणार आहेत. परिमंडळ-१ च्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व पोलिस ठाण्यांमधील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. आज गुरुवार (दि. 10) सायंकाळी सहा वाजता दुर्वांकुर सभागृहात बैठक होणार आहे.
गणेशोत्सव हा शहरातील सर्वात मोठा उत्सव आहे. या सोहळ्याच्या तयारीसाठी पुणे पोलिसांनी उद्या गणेश मंडळांची बैठक आयोजित केली आहे. झोन १, डेक्कन, फरासखाना, खडक, समर्थ, शिवाजीनगर, विश्रामबाग पोलीस ठाण्यातील गणेश मंडळांची ही बैठक होणार आहे.
गणेशोत्सवादरम्यान मंडळांना येणाऱ्या अडचणी, सार्वजनिक गणेशोत्सव सोहळ्यासाठी आवश्यक असलेली परवानगी आदी मुद्द्यांवर यावेळी चर्चा होणार आहे. तसेच गणेशोत्सव काळात गणेश मंडळांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने गणपती उत्सव स्थळाच्या सुरक्षेसाठी गणेशोत्सवादरम्यान वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.












