पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २६ : सध्या गणेश उत्सवाची धामधून संपूर्ण शहरात सुरु आहे. पुणे पोलिसांचा देखील शहरात मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला आहे. याच पाश्वभूमीवर पुन्हा एकदा देशी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. प्रथमेश अशोक धोंडे (वय १९ रा. माळवाडी हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोणताही अनुसूचित प्रकार घडून नये या साठी लोणीकंद पोलिसांकडून परिसरात पेट्रोलिंग सुरु होते. मांजरी खुर्द स्मशानभूमी समोर एक इसम उभा असून त्याच्या जवळ देशी बनावटीचे पिस्टल बाळगून असल्याचे पोलीस अंमलदार स्वप्नील जाधव व दत्ता गावडे यांना गुप्त बातमी मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीकडून १ देशी बनावटीचे पिस्टल व १ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. लोणीकंद पोलीस स्थानकात आरोपी विरोधात भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास बाबासाहेब सकाटे करीत आहेत.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ शशिकांत बोराटे, सह पोलीस आयुक्त येरवडा विभाग संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सह पोलीस निरीक्षक गजानन जाधव, रवी गोडसे, पोलीस अंमलदार कैलास साळुंखे, विनायक साळवे, अजित फरांदे यांनी केले आहे.












