प्रतिनिधी । बीड
दि.6. गोवा राज्यातून विदेशी दारु आणत तिची बीड जिल्ह्यात विक्री केली जाते. शुक्रवारी (दि.4) एका वाहनात गोव्यातील दारु येत असल्याची माहिती दारुबंदी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. बीड-अंमळनेर रास्त्यावरील उकांडा फाटा येथे सापळा लावून दारुबंदी विभागाने वाहनासह दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिल शंकरराव इंगळे (रा.वृंदावनगार्डन, बीड), गोरख बळीराम कांबळे (रा.आयोध्यानगर, बीड), दिपक चंद्रकांत घोरपडे (रा.जुना मोंढा, बीड) यांच्यावर दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे गोव्यातील विदेशी दारु आणून बीडमध्ये विक्री करत होते. बीड-अंमळनेर मार्गावर ह्युदांई कारसह (एमएच-23, एएस-3545) 10 लाख 2 हजार 500 रुपयांची दारु जप्त करण्यात आली. न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसांची एक्साईज कोठडी सुनावली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विश्वजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे प्रमुख दुय्यम निरीक्षक व्ही.डी.आगळे, ए.सी.खाडे, ए.एस.नायबळ, जवान बी.के.पाटील, एस.ए.सांगुळे, एस.व्ही.धस, आर.एम.गोणारे, एन.बी.मोरे, सुशील ढोले, पी.पी.मस्के, के.एन.डुकरे यांनी केली. पुढील तपास अभय औटी करत आहेत.
———-












