पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०३ : तुझ्या मुळे माझी नोकरी गेली, तुला मी जिवंत सोडणार नाही म्हणत तरुणाला मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न तसेच भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या मामे भावावर लोखंडी शस्त्राने वार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना फुरसुंगी परिसरातील पापडे वस्ती भेकराईनगर येथील सिंहगड कॉलनीत सोमवारी (दि.२) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसात विनय खवळे यांनी फिर्याद दिली आहे.
पंकज अंकुश धोत्रे (वय २८ रा. सिंहगड कॉलनी,पापडे वस्ती भेकराईनगर फुरसुंगी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर विनय खवळे (वय २४ रा.सिंहगड कॉलनी,पापडे वस्ती भेकराईनगर फुरसुंगी) असे भांडणात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या बाबत अधिक माहिती अशी कि फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या समोर राहतात.
सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास विनयला फुरसुंगी रस्त्यावर पंकजने त्याला अडवले. फिर्यादी विनयला शिवीगाळ करून तोंडावर ठोसा मारत खाली पडले. या दोघांची भांडणे सोडवण्यासाठी विनयचा मामे भाऊ रणजीत रिठे मध्ये आला. मात्र, पंकजने त्यांनाही शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.
तसेच घरातून लोखंडी शस्त्र रोखून “तू माझ्याबद्दल चाड्या करतो, तुझ्या मुळे माझी नोकरी गेली, माझ्याकडे सारखा रागाने बघतो, थांब तुला मी जिवंत सोडणार नाही, तुझा कायमचा विषय संपवून टाकतो” असे म्हणत मामे भाऊला मारहाण केली.
व डोक्यात शस्त्राने वार कारत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आरोपी विरोधात भा.द.वि.कलम ३०७,३२३,५०४,५०६, म.पो.का ३७(१) १३५ सह भारतीय हत्यार कायदा ४ (२५) अंतर्गत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक खळदे करीत आहे.












