बीड (प्रतिनिधी) – शहरातील बुंदलपुरा भागात असलेल्या नवीन भाजी मंडई रस्त्यावर, माजी आमदार तथा मेफ्को चे माजी अध्यक्ष सय्यद सलीम यांच्या घराजवळ असलेल्या धोंडीपुरा केंद्रीय प्राथमिक शाळेची जुनी इमारत कोसळण्याच्या मार्गावर आली असून ती कधीही पडू शकते. ज्यात जीवित व वित्तहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तेव्हा याकडे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी जातीने लक्ष घालण्याची गरज आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्व जबाबदार अधिकाऱ्यांनी या शाळेच्या इमारतीबद्दल ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे असे मत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले आहे.

याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, एकेकाळी या इमारतीमध्ये असलेली केंद्रीय प्राथमिक शाळा धोंडीपुरा ही काही वर्षांपूर्वी या इमारतीमधून अन्यत्र हलविण्यात आली. तेव्हापासून ही इमारत बंद अवस्थेत पडून आहे. कुलूप बंद असल्याने याकडे गेल्या अनेक वर्षापासून कुणीही लक्ष न दिल्याने आतून या इमारतीची पडझड झाली असून आत मध्ये अनेक प्रकारची झाडे झुडपे वाढलेली दिसत आहे. शिवाय डबल मजली असलेल्या या इमारतीची पश्चिमेकडील भिंत बाहेर बाजूस म्हणजेच गल्लीकडे कलल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तसेच याच बाजूच्या भिंतीचे अनेक लहान मोठे दगड भिंतीमधून निखळून गल्लीत पडले आहे. विशेष म्हणजे भिंतीला ज्या जागी भगदाड पडले आहे त्याच्या दोन्ही बाजूस एकीकडे लाकडी खिडकी तर दुसरीकडे मोकळी खिडकी आहे. ज्यामुळे या भिंतीला मजबुतीसाठी खालून आवश्यक तेवढा आधार राहिलेला नाही. त्यात पुन्हा सध्या पावसाळ्याचे दिवस असून सातत्याने जर काही दिवस पाऊस पडला तर ही इमारत कधीही कोसळू शकते. काही महिन्यांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर असलेल्या रहेमतनगर येथील एक नव्याने बांधकाम झालेली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती. ही घटना सुद्धा बीड शहरात ताजीच आहे. धोंडीपुरा शाळेची ही जुनी इमारत कोसळली तर जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ही इमारत दुमजली असल्याने याची उंची प्रचंड आहे. जर ही इमारत अचानक कोसळली तर जीवित हानी होण्याचा धोका तर आहेच शिवाय समोरील इमारतींना सुद्धा याची झळ बसू शकते आणि समोरील चांगल्या इमारतींचे सुद्धा नुकसान होऊ शकते. समाजात वावरताना बऱ्याचदा शासकीय-प्रशासकीय अधिकारी हे जनतेकडून निवेदन आल्याशिवाय किंवा कुणी तोंडी अथवा लेखी तक्रार दिल्याशिवाय काम करत असल्याचे सहसा दिसत नाही. मात्र काही बाबी अशा असतात की, जनतेकडून तक्रार अथवा निवेदन न येता ही अधिकाऱ्यांनी आपल्या पातळीवर निर्णय घेऊन कामे करावीत. जेणेकरून संभाव्य धोका अथवा नुकसानी पासून नागरिकांना वाचविता येईल. तेव्हा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे या तिन्ही अधिकाऱ्यांनी आता धोंडीपुरा शाळेच्या या जुन्या इमारतीबद्दलही योग्य निर्णय घेऊन कार्य करणे अपेक्षित असल्याचे मत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केले आहे.












