पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २७ : मानवाने पर्यावरणात केलेल्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी झाली आहे. पर्यावरणात मानवाचा हस्तक्षेप कायम राहिल्यास भविष्यात मानवाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा यूजीसीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन यांनी दिला. भविष्यातील धोका टाळण्यासाठी युवा पिढीला पर्यावरण रक्षणाविषयी जागरूक करणे आवश्यक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या युवा पिढीतील संशोधकांना पुण्यातील तेर पॉलिसी सेंटरतर्फे राष्ट्रीय स्तरावर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान केला जातो. माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पुरस्कारप्राप्त संशोधकांच्या नावाची घोषणा आज ऑनलाईन झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली. त्या वेळी डॉ. पटवर्धन बोलत होते. पर्यावरण तज्ज्ञ, निवड समिती सदस्य सुनील मुरलीधर शास्त्री, तेरच्या संस्थापक संचालक डॉ. विनिता आपटे यांच्यासह देशातील अनेक मान्यवर कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या पुरस्कारासाठी सुमारे 1100 संशोधकांनी प्रवेश नोंदविला होता. मोहम्मद मुसाहिब (आयआयटी, रुरकी), सुमजा कोल्ली (आयआयटी, जोधपूर), मॅक्लिन ॲन्टनी सॅन्टोस, कुंजू लक्ष्मी के. (सत्यभामा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी, चेन्नई), सैय्यद मरजूक एम. (भारतीदासन युनिर्व्हसिटी), कविता किमारी (कुमाऊ युनिर्व्हसिटी, नैनिताल उत्तराखंड) यांना प्रत्येक 25 हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.
मानवाने पर्यावरणाची हानी केली असल्याचे सांगून डॉ. पटवर्धन पुढे म्हणाले, सध्याची पर्यावरणाची स्थिती बघता आपण कुठे जात आहोत आणि भविष्यात आपण कुठे पोहोचणार आहोत हा विचार करण्याचा मुद्दा आहे. शाश्वत जीवशैली अंगिकारण्याचे उद्दिष्ट पुरेसे समाधानकारक नाही असेही त्यांनी सूचित केले.
सुनील मुरलीधर शास्त्री म्हणाले, वृक्षतोड, उत्खनन आणि इंधनाच्या अति वापराचा हव्यास यामुळे निसर्गचक्राचा समतोल ढासळला आहे. जमिनीची उत्पादन क्षमता घटली आहे, पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि संवर्धन ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबविणे सद्यस्थितीत काळाजी गरज आहे.
डॉ. विनिता आपटे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देऊन पर्यावरणविषयक राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची ओळख करून दिली. तसेच मान्यवरांचे स्वागत केले. पुरस्कारप्राप्त संशोधकांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करून आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन स्नेहा करडे (भोसले) यांनी केले.












