पुणे प्रतिनिधी
पुणे शहर व जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत फक्त ६८४.१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. आतापर्यंत पडलेल्या पावसाचे हे प्रमाण वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत ७८.९ टक्के इतके आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत शहर व जिल्ह्यात मिळून १०४७.५ मिलिमीटर पाऊस पडला होता. या आकडेवारीवरून गेल्या वर्षीच्या तुलनेत आज अखेरपर्यंत ३६३.४ मिलिमीटर पाऊस कमी पडला आहे.
गेल्या वर्षी १ जून ते २ ऑक्टोबर या सुमारे चार महिन्यांच्या कालखंडात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला होता. यंदाच्या पावसाळ्यात मात्र अद्याप पावसाला वार्षिक सरासरी गाठता आलेली नसल्याचे जिल्हा कृषी विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पावसाच्या आकडेवारी अहवालातून उघड झाले आहे. पुणे शहर व जिल्ह्याचा मिळून ८६६.३ मिलिमीटर इतका पाऊस आहे.
दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात आज अखेरपर्यंत पडलेल्या पावसानुसार जिल्ह्यातील मावळ, भोर, आंबेगाव आणि खेड या चारच तालुक्यात त्या त्या तालुक्याच्या वार्षिक सरासरीहून अधिक पाऊस पडला आहे. याशिवाय जुन्नर आणि वेल्हे हे दोन तालुके त्या त्या तालुक्यांच्या वार्षिक सरासरी पावसाच्या आसपास पोचले आहेत.
पुणे शहरात ४३७ मिलिमीटर पाऊस
पुणे शहरात यंदाच्या पावसाळ्यात एकूण ४३७.१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पावसाचे हे प्रमाण शहराच्या वार्षिक सरासरी पावसाच्या ७१.६ टक्के इतके आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात आजच्या तारखेपर्यंत पुणे शहरात एकूण ८०५.८ मिलिमीटर (१३२ टक्के) पाऊस पडला होता, असे दिसून आले आहे.
अशी असते प्रक्रिया
• जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने दरवर्षी एक जूनपासून दररोज पडणाऱ्या पावसाची नोंदणी केली जाते.
• यानुसार दररोज तालुकानिहाय पडलेल्या पावसाची नोंद.
• महिनानिहाय एकूण सरासरी पावसाची नोंद.
• एकूण सरासरी पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात झालेल्या पावसाच्या आकडेवारीचा अहवाल रोज रात्री प्रसिद्ध केला जातो.












