पुणे : हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील आई-बहिण-वहिनी आणि प्रेयसीची ओळख आज पुन्हा एकदा रसिकांना झाली. दिदी अभिनय करत नाही तर भूमिका जगतात, नखशिखांत स्त्रीत्वाचे परिपूर्ण दर्शन म्हणजे सुलोचना दिदी. एकाच चेहऱ्यात आई, बहिण, वहिनी यांचे रूप दिसणारी स्त्री म्हणजे सुलोचना दिदी होय अशा भावना सुहृदांनी व्यक्त केल्या.
निमित्त होते स्व. सुलोचना दिदी यांच्यावरील ‘चित्रमाऊली’ या लघुपटाच्या पहिल्यांदाच झालेल्या प्रदर्शनाचे. केंद्र सरकार अंतर्गत असलेल्या फिल्मस् डिव्हिजनने या लघुपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन शैलेश शेट्ये यांचे आहे. लघुपटातील कलाकारांची रंगभूषा गौरी प्रधान यांनी केली आहे. स्व. सुलोचना दिदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून हा लघुपट एस. एम. जोशी सभागृहात रसिकांना दाखविण्यात आला. पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचचे किशोर सरपोतदार, महेकच्या मनिषा निश्चल, गेट सेट गोचे अमित कुलकर्णी यांच्या पुढाकारातून लघुपटाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या लघुपटानिमित्ताने स्व. सुलोचना दिदी यांच्यावर चित्रीत झालेल्या श्रवणीय गीतांचा आस्वादही रसिकांना घेता आला. मनिषा निश्चल, मंदार रत्नपारखी आणि सहकाऱ्यांनी वाद्यवृदांसह गीते सादर केली.

श्रीकांत मोघे, विक्रम गोखले, रमेश आणि सीमा देव, किरण शांताराम, रोहिणी हट्टंगडी, काशिनाथ घाणेकर, विजय गोखले, अशोक आणि निवेदिता सराफ, महेश कोठारे, पल्लवी जोशी, सचिन खेडेकर, अशोक पत्की, राजीव पार्सेकर, कांचन अधिकार, अस्मिता खटखटे, मृणाल कुलकर्णी, श्रीकांत धोंगडे, गोपी कुकडे, भावना सोमैय्या, जॉनी लिव्हर यांनी दिदींविषयीच्या अनेक आठवणी सांगितल्या. चारूकाका सरपोतदार यांना सुलोचना दिदी यांनी भाऊ मानले होते. त्यांच्याविषयीच्या आठवणी सांगताना किशोर सरपोतदार सद्गतीत झाले.
स्व. सुलोचना दिदी यांचा जीवनप्रवास उलगडत गाण्यांची गुंफण असलेल्या सुमधूर गीतांचा नजराणा सुरुवातीस ‘महक’च्या मनिषा निश्चल यांच्या पुढाकारातून सादर झाला. मनिषा निश्चल आणि मंदार रत्नपारखी बहारदारपणे सादर केला. ‘जाहली जागी पंचवटी’,‘नको देव राया अंत आता पाहू’, ‘दैव जाणले कुणी’, ‘चाळ माझ्या पायात’, ‘शूर आम्ही सरदार’, ‘अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया’ अशी अनेक चित्रपट गीते या निमित्ताने रसिकांना ऐकायला मिळाली. गायकांना पराग पांडव (तबला), अभय इंगळे (ऑक्टोपॅड), आदिती गराडे (हार्मोनियम), अमृता ठाकूरदेसाई (की-बोर्ड) यांनी सुरेल साथ केली. संहिता लेखन डॉ. माधवी वैद्य यांचे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा फुलकर यांनी केले. अजित कुमठेकर यांच्या समन्वयातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी न. म. जोशी, मेघराज राजेभोसले, प्रतिभा शाहू मोडक, आनंद माडगुळकर, सुहासिनी देशपांडे, अंकुश काकडे, सुनील महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.












