पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २४ : प्रवाशांना विविध सुविधा देण्यासाठी पुणे रेल्वे विभाग प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असते. आता पुणे रेल्वे स्थानकावर विमानतळ आणि मॉलसारख्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पुणे रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या हस्ते शनिवार, 22 जुलै रोजी पुणे स्थानकावर आरामदायी झोन किऑस्कच्या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले आहे. प्रवाशांना बॉडी मसाजचा आनंद घेता यावा यासाठी अरामा कंपनीच्या तीन रोबोटिक मसाज खुर्च्या येथे बसवण्यात आल्या आहेत. हे किऑस्क प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आहे. हे बेंगळुरूस्थित रोबोटिक टेक्नॉलॉजीज कंपनीद्वारे चालवले जाणार आहे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पाच मिनिटांसाठी ६०/- रुपये, १० मिनिटांसाठी १००/- रुपये, १५ मिनिटांसाठी १५० रुपये आणि २० मिनिटांसाठी १८० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
मसाज खुर्चीच्या फायद्यांमध्ये रक्त परिसंचरण सुधारणे, स्नायूंचा ताण कमी होणे, पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम, शारीरिक आकार सुधारणे आणि झोपेची गुणवत्ता सुधारणे यांचा समावेश आहे.
वास्तविक, 12 ते 48 तासांच्या प्रवासानंतर लोक थकतात. कोणत्याही कारणास्तव ट्रेन लेट झाली तर प्रवासात त्रास होतो. थकवा आल्याने कामावर परिणाम होतो. घरी पोहोचल्यावरही लोकांना थकवा जाणवतो. अशा परिस्थितीत स्थानकावर बांधण्यात आलेले मसाज चेअर किऑस्क प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
अशी माहिती पुणे रेल्वे विभागाचे विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक व जनसंपर्क अधिकारी डॉ.रामदास भिसे यांनी दिली आहे.












