पुणे | प्रतिनिधी
पुणे : पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी कक्षाने उत्तमनगर परिसरातून चार जणांना अटक केली असून, आरोपींनी खंडणी मागण्यासाठी अपहरण केलेल्या दोन महिलांच्या सुटका केले आहे. पीडित महिलांच्या एका मुलाने प्रकरणात मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.
मीनाक्षी पोखरे आणि मनीषा पवार या पीडित महिलांना आरोपींनी उत्तमनगर भागात मारहाण करून घरात कोंडून ठेवले. आरोपीने फिर्यादीकडे आई आणि पीडितेला सोडून देण्यासाठी १७ लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. तपशील मिळाल्यानंतर पोलीस पथकाने
या प्रकरणावर त्वरित कारवाई केली आणि पिडीतांचे त्यांचे लोकेशन ट्रेस केले.
बाबूलाल लक्षण मोहोळ (वय 45) अमर नंदकुमार मोहिते (वय 39) प्रदीप प्रभाकर नलावडे (वय 38) आणि अक्षय मारुती फड (वय 24) या चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. मोहोळ हा हिस्ट्री शीटर असून त्याच्यावर यापूर्वी दहा वेगवेगळ्या गुन्हांची नोंद आहे. तर मोहीतेवर पाच आणि नलावडे यांच्यावर यापूर्वी दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना पुणे रेल्वे स्थानकावर व्यवसायासाठी दुकाने घ्यायची असून महिलांनी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, महिलांना दुकाने न मिळाल्याने त्यांचे सहा लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा आरोप आरोपींनी केला आहे. याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी महिलांचे अपहरण करून खंडणीची मागणी केली होती.












