पुणे | प्रतिनिधी
जुन्या भांडणाच्या वादातून बोलायला आलेल्या आरोपीला तरुणाने बोलण्यास नकार दिला. या रागातून आरोपीने थेट पिस्तूल रोखून तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार गुरुवार दि.28 रात्री पिंपरी येथे घडला असून याप्रकरणी रोहित भगवान वाघमारे (वय 29 रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
रोहित यांच्या तक्रारीवरून पिंपरी पोलिसांनी जतीन बिपिन टाक (वय 30) सलमान शेख (वय 31) जुनेद शेख (वय 19) कृष्णा उर्फ बॉक्सर बाळू पारधे (वय 25) सर्व राहणार पिंपरी यांच्यावर खूनाचा प्रयत्न व बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांचे जुने भांडण होते. या भांडणातूनच जितीन व त्याचे साथीदार फिर्यादी रोहित यांच्या घरी आले व त्यांनी रोहितला बोलायचे आहे असे सांगितले.
रोहितने बोलण्यास नकार देऊन ते त्यांच्या घरी गेले असता आरोपींनी त्यांना घराबाहेर ओढत आणून पिस्तूल सारखे शस्त्र रोखून जीवे मारण्याची धमकी दिली व हाताने मारहाण करत परिसरात दहशत निर्माण केली.
यात रोहित जखमी झाले यावरून पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नसून पिंपरी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.












