पिंपरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्यपदी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.माधव सरोदे यांची निवड झाली आहे.
प्रोफेसर डॉ. माधव सरोदे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर या ठिकाणी प्रभारी प्राचार्य म्हणून कार्य केले आहे. नाविन्यपूर्ण कार्यात त्यांनी डिजिटल स्टॅपलरचे पेटंट सादर केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नियतकालिकांमध्ये २९ संशोधन पेपर प्रकाशित केले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, परिषदा, कार्यशाळांचे आयोजन त्यांनी केले आहे.
एक संदर्भग्रंथ व विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रमावर आधारित अकरा पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. याबरोबरच लोकोशिवा विद्यापीठ, जपान व कोरिया मेरीटाईम अँड ओशियन युनिव्हर्सिटी, बुसन, दक्षिण कोरिया या ठिकाणी आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात त्यांनी संशोधन पेपर सादर केले आहेत. विद्यापीठ व विभागीय स्तरावर आविष्कार स्पर्धेचा परीक्षक, स्थानिक व्यवस्थापन समिती, विषयतज्ज्ञ, अभ्यासक्रम तयार करणे यासारख्या विविध पातळ्यांवर त्यांनी महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर कार्य केले आहे.
गेल्या सोळा वर्षांपासून संशोधन क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच विद्यार्थी पीएच.डी. पदवीसाठी (विद्यावाचस्पती) संशोधन करीत आहेत. महाविद्यालय विकास समिती, नॅक कामकाज समिती, डीएसटी-फिस्ट नोडल ऑफिसर, विविध शॉर्ट टर्म कोर्सेसचा समन्वयक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विषयाच्या अभ्यासमंडळावर ते निवडून आले आहेत.
त्यांच्या एकूणच या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन रयत शिक्षण संस्थेने त्यांची महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्यपदी निवड केली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल माजी महापौर संजोगजी वाघेरे पाटील, कला शाखा प्रमुख डॉ. मृणालिनी शेखर, विज्ञान शाखा प्रमुख प्रा. शहाजी मोरे, वाणिज्य शाखा प्रमुख प्रा. अनिकेत खत्री, आय. क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. नीलकंठ डहाळे, महाविद्यालय विकास समितीतील सर्व सदस्य, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.












