पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.१२ : पुणे महानगरपालिकेतील चतुर्श्रुंगी पाणीपुरवठा विभागामध्ये मीटर रीडरवर लाच मागितल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी एका इसमाने डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये उमेश राजाराम कवठेकर ( वय ५४, मीटर रीडर चतुर्श्रुंगी पाणीपुरवठा विभाग पुणे महानगरपालिका ) याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी हे परवानाधारक प्लंबर असून ते लायझनिंग चे काम करतात. त्यासाठी त्यांनी पुणे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाकडून न हरकत पत्र मिळवण्यासाठी अर्जदार बिल्डर यांच्या वतीने सिटी सर्वे नंबर २२८१ ते २२८८ शिवाजीनगर, भांबुर्डा, पुणे येथील मिळकतीचे पाणीपुरवठा विभागाचे ना हरकत पत्र मिळावे यासाठी प्लंबिंग लायसन्स ची कागदपत्रे जोडून अर्ज दिला होता. पाणीपुरवठा विभागाचे ना हरकत पत्र मिळवण्यासाठी ते वारंवार प्रयत्न करत होते.
फिर्यादी हे ना हरकत पत्र घेण्यासाठी कर्वे रोड येथील पाणीपुरवठा विभागात गेले होते. त्यावेळी मीटर रीडर उमेश कवठेकर यांनी ना हरकत पत्र देण्यासाठी पंचवीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
फिर्यादींनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार तक्रारीची पडताळणी केली असता, उमेश कवठेकर यांनी ना हरकत पत्र देण्यासाठी फिर्यादीकडून दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी प्रत्येकी दहा हजार रुपये व स्वतःसाठी पाच हजार रुपये अशी एकूण पंचवीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
फिर्यादी हे लाचेची मागणी केलेली रक्कम चतुर्श्रुंगी पाणीपुरवठा विभाग कार्यालय, कर्वे रोड,पुणे येथे घेऊन गेले असता आरोपी उमेश कवठेकर याला पोलिसांनी रंग हात पकडले.
आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.पुढील तपास ला. प्र. वि पुणे येथील पोलिस निरीक्षक संदीप वऱ्हाडे हे करत आहेत.
सदर गुन्ह्याची कारवाई मा.पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे, ला. प्र. वि पुणे परिक्षेत्र मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शितल जानवे, ला. प्र. वि पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
लोकसेवकांनी लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालय येथे संपर्क साधण्याचे आवाहन श्री.अमोल तांबे पोलीस अधीक्षक ला. प्र. वि पुणे यांनी नागरिकांना केले आहे.












