पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.१८ : काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या गेटजवळ दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले होते. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथून दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. परंतु, या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील रुग्णालयातून फरार झाला होता. पोलिसांच्या सुरक्षेतून आरोपी फरार झाल्याने पोलिसांची मोठी नाचक्की झाली होती. तसेच विरोधकांनीही हे प्रकरण उचलून धरत सरकारवर गंभीर आरोप केले होते.
दरम्यान ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी तमिळनाडू येथून अटक केली आहे. त्यानंतर आता स्वतः ललित पाटील ने आपण पुण्यातील ससून रूग्णालयातून पळालो नव्हतो तर, मला पळवलं गेलं होतं असा खळबळजन दावा केला आहे.
तसेच यात कुणाकुणाचा हात आहे हे सर्व समोर आणणार असल्याचेही पाटील याने म्हटले आहे. त्यामुळे चौकशीदरम्यान ललित पाटील नेमकी कोणा-कोणाची नावे घेतो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
वैद्यकीय तपासणीसाठी नेताना पाटीलने वरील खळबळजनक दावे केले आहेत. त्यामुळे ललित याला ससूनमधून पळवण्यामागे कुणाचा हात आहे. यात काही राजकीय पाठिंबा आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.












