पुणे प्रतिनिधी
पुणे दि. २६ : आई पासून १५ कि.मी. दुरावलेल्या ८ वर्षाच्या मुलाला मुंढवा पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून २ तासात आईचा शोध घेऊन सुरक्षित रित्या सोपवल्याची कामगिरी केली आहे.
मुंढवा ब्रिज परिसरात शुक्रवार (दि.२५) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ८ वर्षाचा मुलगा एकटाच रडत आल्याचे रोडने जाणाऱ्या चालक अतिश विठ्ठल जगदाळे (वय २८ रा. साईनाथ नगर, वडगाव शेरी) यांनी माणुसकी दाखवत मुलाला मुंढवा पोलिसांच्या ताब्यात दिले. सह.पोलीस फौजदार होले व अंमलदार उमा चोरघे यांनी मुलाची विचारपूस केली. मात्र मुलाला कोणतीही महिती सांगता येत नसल्या मुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे यांच्याकडे हे प्रकरण घेऊन गेले.
सदर मुलाचे आई-वडील व नातेवाईक यांचा शोध घेण्यासाठी बीट मार्शल वरील पोलीस अमलदार सचिन मेमाणे संदीप गरजे यांना मुंढवा चौक खराडे ब्रिज भागातील लेबर कॅम्प भिकारी फुटपाथ वरील फुगे विक्रेते यांना फोटो दाखवून मुलाच्या आई-वडिलांचा शोध घेतला. त्यासोबतच नागरिक,पोलीस,पत्रकार यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर सदर मुलाचा फोटो व्हायरल करून मुलाच्या आई-वडिलांचा शोधा बाबत आव्हान करण्यात आले.
सदरचा मुलगा कात्रज चौक भागातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पालकांना बोलावून घेतले. पोलीस तपासात सदर मुलाचे नाव संजय पवार असून कात्रज परिसरात राहणारा आहे. मुलाचे कुटुंब गरीब असून फूटपाथवर राहून फुगे व इतर वस्तूची विक्री करतात. पोलिसांनी मुलाला आई आशा पवार यांच्या ताब्यात दिले. पालकांनी पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सदर परिसरातील नागरिकांनी या कामगिरी बद्दल पोलिसांचे कौतुक केले.
सदरचे कामगिरी पोलीस उपायुक्त परि-५ विक्रांत देशमुख, सह पोलीस आयुक्त हडपसर विभाग अश्विनी राख, यांच्या मार्गदर्शनाखाली मुंडवा पोलीस स्थानकातील पोलिसांनी कामगिरी केली आहे.












