पुणे : राष्ट्रीय कीर्तनकार, संगीत रंगभूमीवरील अष्टपैलू गायक, रंगधर्मी चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांना मुंबई विद्यापीठाद्वारे विद्यावाचस्पती (पीएचडी) या पदवीने गौरविण्यात आले आहे. या निमित्त भरत नाट्य संशोधन मंदिर आणि विश्व मराठी परिषदेतर्फे आफळे यांचा रविवारी
(दि. 13) सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम सायंकाळी 5:30 वाजता भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. सत्कार सोहळ्यास अखिल भारतीय संत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प. पू. मदन महाराज गोसावी, संत साहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ संगीत नाट्य अभिनेते अरविंद पिळगावकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे आणि विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष क्षितिज पाटुकले यांनी निवेदनाद्वारे दिली. सत्कार सोहळ्यानंतर ह. भ. प. चारुदत्त आफळे यांचे कीर्तन होणार आहे.
चारुदत्त आफळे यांना भक्तिसंगीत, कीर्तनीसंगीत आणि नाट्यसंगीत या विषयांवर प्रबंधाद्वारे विद्यावाचस्पती (पीएचडी) ही पदवी प्राप्त झाली आहे. गेल्या 35 वर्षांत आफळेबुवा यांची देश–विदेशात दहा हजारांपेक्षा जास्त कीर्तने–प्रवचने झाली आहेत. शालेय वयापासून त्यांनी संगीत नाटकांमधून विविध भूमिका साकारल्या असून ते 40 वर्षांपासून संगीत नाट्यक्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कलाकार आहेत. मालिका, चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारलेल्या आहेत.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.












