पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २९ : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आमदार रोहीत पवार यांना थेट रात्री दोन वाजता नोटीस पाठवत बारामती ॲग्रो प्लांट ७२ तासात बंद करण्याचे आदेश दिले. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली. राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आल्याचे आमदार रोहीत पवार यांनी ट्विट करता सांगितले.
ते म्हणाले, ‘युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो’ अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी या कारवाईवर दिली होती.
या एकूणच कारवाई संदर्भात शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांची उत्सुकता होती. पवार यांनी आज गोविंद बाग येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना रोहित पवार यांच्या कंपनीवरील कारवाईबाबत प्रश्न विचारला. त्यावर पवार म्हणाले, यावर मी उत्तर देणार नाही. इंडिया आघाडीत वाद होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ असं मोजकेच उत्तर देत ठोस मात्र त्यांनी काहीच सांगितले नाही.












