ड्रग्ज तस्करी प्रकरणात काल मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला अटक केल्यानंतर कारवाईला वेग दिला. आज या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन महिलांना अटक केली आहे.
ललित पाटील ज्यावेळी ससून रुग्णालयातून पळून गेला त्यानंतर या दोघीजणी त्याच्या संपर्कात होत्या. या दोन महिलांनी त्याला पळून जाण्यात मदत केल्याची माहिती आता समोर येत आहे.
याआधी मुंबई पोलिसांनी कारवाई करत ड्रग माफिया ललित पाटीलला चेन्नईतून अटक केली होती. त्यानंतर त्याला पुण्यात आणून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. या प्रकरणात पुणे पोलीसही अॅक्टिव्ह झाले आहेत.
त्यांनी काल नाशिकमधून दोन महिलांना अटक केली आहे. ललित पाटील पळून गेल्यानंतर तो नाशिकला गेला होता. तो येथे आला त्यावेळी या महिलांनी त्याला पैसे दिले होते. तसेच त्याची राहण्याची आणि पळून जाण्यासाठी देखील मदत केल्याची माहिती समोर आली होती.
जमा झालेले पैसे आणि सोने सुद्धा या महिलांकडेच होते अशी माहिती पोलिसांकडे होती. पुणे पोलिसांनी बुधवारी रात्री या महिलांना नाशिक शहरातून अटक केली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.












