पुणे : बुधवारी (दि १९) रोजी रात्री स्वारगेट परिसरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. पुणे शहरातील स्वारगेट चौकात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दुकानदारावर गोळीबार केला आहे. या घटनेत दुकानदार जखमी झाला आहे. चार लाख रुपये घेऊन आरोपी फरार झाले आहेत. लतेश हसमुखलाल मोदी उर्फ सुरतवाला (वय ५२) असे जखमी विक्रेत्याचे नाव आहे.
पुणे पोलीस परिमंडळ २ च्या डीसीपी स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश कला क्रीडा मंच येथे दुचाकीवरून दोघेजण जात होते. त्यांच्या शेजारी एक रिक्षा जात होती. एका रिक्षाचालकाने दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीवर गोळीबार केला.
लतेशने व्यवसायातून जमा केलेले चार लाख रुपये बॅगेत टाकून दुचाकीवरून घरी जात होते. त्यांच्यासोबत त्यांचा सहकारी देखील होता. रात्री 9.00 ते 9.30 या वेळेत आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. एक गोळी त्यांच्या पाठीत आणि दुसरी मांडीला लागली आहे, त्यानंतर ते तिथेच कोसळले. त्यांच्याकडील चार लाख रुपये किमतीची बॅग घेऊन चोरट्यांनी पलायन केले आहे. या घटनेनंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी रक्ताचे डाग आणि तीन गोळ्या सापडल्या आहेत. या घटनेतील आरोपींचा शोध सुरू असून, या हल्ल्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
मात्र, याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामध्ये लतेश हे जखमी झाले असले तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस अधिक तपास करत आहेत.
स्वारगेटमध्ये वर्दळीच्या वेळेत तंबाखू व्यापारावर गोळीबार












