पिंपरी- आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा तर मांडलाच त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांवर पलटवार केला. काल मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आई – बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा आरोप केला जात आहे. आणि हाच मुद्दा फडणवीसांनी विधानसभेत मांडला तसेच अनेक भाजप नेत्यांनी त्या विरोधात आवाज उठवला. सध्या हा मुद्दा राजकीय वातावरणात पेट घेत असून, यावर बोलताना मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेंनी दिलगिरी व्यक्त केली.
मराठा समाजाला ओबीसींमधून सगेसोयऱ्यांसह आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक झुरत आहेत. जरांगे पाटलांनी आमरण उपोषण देखील केले. याबाबत सरकारने अधिसूचना देखील काढली. मात्र सरकारने सगेसोयऱ्यांच्या बाबतीतील निर्णय टांगणीवर ठेवलाय आणि याच मागणीच्या अंमलबजावणीवरुन जरांगे आक्रमक झाले. यात त्यांची जीभ घसरली. काल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत अपशब्द वापरले. पण मनोज जरांगेनी यावर स्पष्टीकर दिले आहे.
ते म्हणाले जनतेला मी मायबाप मानतो आणि अनावधानाने माझ्याकडून शब्द गेले असतील. कारण माझ्या पोटात १७ – १८ दिवस झाले अन्नाचा कण नव्हता. त्यामुळे मी माझ्या माता माऊलीला मानतो जर आई-बहिणीवरुन माझ्याकडून शब्द गेले असतील तर मी मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. मी त्या छत्रपतींच्या विचारावरच चालतोय त्यामुळे माझ्याकडून झालेल्या चुकीची मी क्षमा मागतो. पण मी मागे हटणार नाही.
जोपर्यंत मराठा बांधवाना न्याय मिळत नाही तोवर मी लढत राहणार असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान त्यांना एसआयटी चौकशीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही त्यांनी ठाम भूमिका बजावली. त्यांना माझ्या काय चौकश्या करायच्या असतील त्यांनी त्या बिनधास्त कराव्या. एसआयटीची चौकशी सुद्धा बिनधास्तपणे चालू द्यावी, त्याबद्दल आपलं काहीच म्हणणं नाही. सगळ्या यंत्रणा त्यांच्याच आहेत, त्यांना त्या कशा चालवायच्या आहेत, काय धाक दाखवायचे ते दाखवा. मात्र मी माझ्या मराठा समाजासाठी आयुष्यभर जेलमध्ये सडायला तयार आहे आणि लढायला पण तयार आहे.
दरम्यान मराठवाडा, जालना, बीड या जिल्यात इंटरनेट सेवा बंद करणे, अंबडमध्ये संचारबंदी लागू करणे, लोकांत काहीतरी वातावरण पसरवून देणे, या सगळ्या गोष्टीमागे देवेंद्र फडणवीस यांचे डोके आहे. परंतु मी ते घडू देणार नाही. मात्र कायमस्वरूपी म्हणजे जोपर्यंत सगेसोयऱ्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन हे सुरु राहील, असा इशारा यावेळी मनोज जरांगेंनी दिला.