पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १९ : टेलिग्रामद्वारे पार्ट टाईम जॉब देण्याच्या बहाण्याने टास्क पूर्ण केल्यास जास्त फायदा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून हिंजवडी येथील एका महिलेला ७१ लाख ८२ हजार ५२० रुपयांचा गंडा घातला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने आंतरराज्य टोळीला अटक केली आहे. या टोळीने ऑनलाईन टास्क फ्रॉड करण्यासाठी ९५ बनावट बँक अकाउंट उघडल्याचे तपासात निष्पन्न झाले असून यांचे एकूण १७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा हा गंभीर व तांत्रिक स्वरुपाचा असल्याने तपासासाठी युनिट चार कडे वर्ग करण्यात आला होता. युनिट चारच्या पथकाने गुन्ह्यात फिर्यादी यांनी ज्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले त्या बँक खात्याबाबत माहिती घेतली. तसेच सखोल तांत्रिक विश्लेषण करुन यातील आरोपींचा शोध घेऊन १४ जणांना विविध राज्यातून अटक केली आहे.
तपासामध्ये आरोपींनी तीन पद्धतीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये पहिल्या स्तरावर यातील आरोपी हे गरीब गरजू व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या नावाने वेगवेगळ्या बँकेत अकाऊंट व फर्म तयार करत होते. दुसऱ्या स्तरावर आरोपी तयार केलेल्या बँक खाते व किट चेकबुक व इंटरनेट बँकींग विकत घेत होते. तर तिसऱ्या स्तरावरील आरोपी हे व्हाट्सअँप व टेलिग्रामच्या माध्यमातून लोकांशी संपर्क करत होते. त्यांना ऑनलाईन टास्क देऊन त्याच्या मोबदल्यात पैशांचे आमिष दाखखून तयार केलेल्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगत होते. गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले. या पथकाने मध्य प्रदेशातील इंदौर, रतलाम, भोपाळ, राजस्थान राज्यातील जयपुर, उदयपुर, भिलवडा, गुजरात राज्यातील वडोदरा, बिहार राज्यातील पाटणा येथून आरोपींना अटक केली.
अटक केलेल्या आरोपींची नावे
चिंतन शशिकांत फडके (वय-३५ रा. निहालपुर मुंडी, इंदौर, मध्य प्रदेश), ब्रजराज रामरतन वैष्णव (वय-१८ रा. भिलवाडा, राजस्थान), सुंदरदास चेतनदास सिंधी (वय-२४ रा. गुलाबपुरा, राजस्थान), राजेश भगवानदार करमानी (वय-२६ रा. अजमेर, राजस्थान), अभिषेक सत्यनारायण पाराशर (वय-२४ रा. अजमेर), नवीनकुमार नेवन्दराम आसनाणी (वय-४० रा. भिलवाडा, राजस्थान), विकास सत्यनारायण पारिख (वय-२९ रा. भिलवाडा, राजस्थान), सुरेश गोवर्धनदास सिंधी (वय-३२ रा. गुलाबपुरा, राजस्थान), ललित नवरतन मल पारिक (वय-३३ रा. भिलवाडा), मनिष ऋषिकेश वैष्णव (वय-३३ रा. भिलवाडा, राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.












