स्कूल बसचा रिव्हर्स गिअर अडकल्याने बस चालक अडकलेला गिअर काढण्यासाठी बसच्या खाली गेला. त्यावेळी त्याने महिलेला बस सुरु करण्यास सांगितले. महिलेने हयगयीने बस सुरु केली असता बसच्या खाली असलेल्या चालकाच्या छातीवरुन बसचे चाक गेले. यात गंभीर जखमी होऊन बस चालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
सुनील वामन खिलारी (रा. राजगुरुनगर, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या बस चालकाचे नाव आहे. याबाबत मयत सुनील यांचा मुलगा अक्षय सुनील खिलारी (वय-२७ रा. वैभव बिल्डींग, तिन्हेवाडी रोड, राजगुरुनगर) याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी महिलेवर आयपीसी ३०४(अ), ३३८, २७९,४२७ सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.२१) सकाळी आठच्या सुमारास चाकण गावच्या हद्दीतील गवते वस्ती येथे झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुनील खिलारे हे स्कूल बसवर (एम एच १४ सी डब्ल्यू १४०४) चालक म्हणून काम करतात. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास बस बंद पडून रिव्हर्स गिअर अडकला. त्यामुळे सुनिल हे बसच्या पुढील डाव्या चाकाच्या खाली जाऊन अडकलेला रिव्हर्स गिअर काढत होते. त्यावेळी सुनिल यांनी आरोपी महिलेला बस सुरु करण्यास सांगितले.
महिलेने तिच्याकडे कोणताही वाहन चालवण्याचा परवाना नसताना बस हयगयीने सुरु केली. बस सुरु केल्यानंतर बस रिव्हर्स गेल्याने बसचे चाक सुनील खिलारी यांच्या छातीवरुन गेले. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर बस पाठिमागे असलेल्या घराला धडकल्याने घराचे नुकसान झाले. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.












