‘मी इथला बादशाह आहे, थांब तुला दाखवतो’ असे म्हणत एका ट्रक चालकावर लोखंडी हत्याराने वार करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार रविवारी (दि.७) सायंकाळी साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान कात्रज बायपास व पुणे-सातारा रोडवर कात्रज पीएमटी बस स्टॉप जवळ घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
मोहन लालू पवार (वय-४५ रा. पाण्याच्या टाकीजवळ, संतोषनगर, कात्रज) याच्यावर आय.पी.सी. ३२४, ५०४, ५०६ व आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याप्रकरणी प्रसाद बाळासाहेब विधाते (वय-२८ रा. उज्वल निवास, आंबेगाव पठार, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी हे ट्रक चालक आहेत. रविवारी सायंकाळी ते त्यांचा ट्रक रोडवर काढत असताना आरोपीने विरुद्ध दिशेने एक रिक्षा पॅगो घेऊन आला. त्यावेळी प्रसाद विधाते यांनी त्याला थांबण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने ‘तुला माहित आहे का मी कोण आहे, मी इथला बादशाह आहे, थांब तुला दाखवतो’ असे म्हणत त्याच्याकडील लोखंडी हत्यार बाहेर काढले. लोखंडी हत्याराने फिर्यादी प्रसाद विधाते यांच्यावर वार करुन गंभीर जखमी करत मारहाण केली. आरोपी फिर्यादी यांना मारहाण करत असताना त्याठिकाणी असलेल्या वाहतूक पोलीस अंमलदार यांनी आरोपीला हत्यारासह ताब्यात घेतले. आरोपी मोहन पवार याच्यार गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार आखुटे करीत आहेत.












