पुणे : गँगस्टर शरद मोहोळ खूनप्रकरणातील ‘एका’ मास्टर माईंडपर्यंत पुणे पोलीस पोहचले असून, गुंड विठ्ठल महादेव शेलार (वय 36, रा. उरावडे, ता. मुळशी) याला गुन्हे शाखेने अटक केली. विठ्ठल शेलारसह पोलिसांनी तिघांना नवी मुंबई परिसरातून अटक केली असून, सात जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, शरद मोहोळचा खून टोळी युद्धातूनच झाल्याचेही यातून दिसत असून, या खूनप्रकरणातील पहिला मोहरा पुणे पोलिसांच्या हाती लागला आहे. जमीन तसेच आर्थिक व्यवहार आणि जुने वाद, यातूनच खून झाल्याचे आता दिसून आले आहे.
गुंड विठ्ठल महादेव शेलारसोबत पोलिसांनी मोहन मारूती पांगारे (वय 36) आणि रामदास नानासाहेब मारणे (वय 37) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. गँगस्टर शरद मोहोळ याचा 5 जानेवारी रोजी सुतारदरा येथील राहत्या घरासमोर साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानुगडे व साथीदारांनी त्याचा गोळ्या झाडून खून केला होता. पसार झालेल्या आरोपींना गुन्हे शाखेने काही तासात बेड्या ठोकल्या आणि तपासात साहिल व नामदेव कानगुडे यांनी आर्थिक व्यवहार व आम्हाला करण्यात आलेली मारहाणीमुळे खून केल्याचे सांगितले. परंतु, शरद मोहोळच्या खूनानंतर हा खून टोळी युद्धातून झाल्याची शक्यता वर्तवली जात होती.
दबक्या आवाजात तशी चर्चा देखील पोलीस दलात आणि गुन्हेगारी क्षेत्रात सुरू होती. मात्र, ठोस हाती काही लागत नसल्याने पोलिसांनी याबाबत प्रथम सौम्यभूमिका घेत तपासाला सुरूवात केली. कोथरूड पोलिसांकडून तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त सुनिल तांबे यांच्याकडे दिला. त्यानंतर आता या गुन्ह्याच्या तपासाला चांगलीच गती आली आहे.
गुन्हे शाखेने आठ जणांच्या अटकेनंतर सखोल चौकशीकरत पिस्तूल पुरविणाऱ्यांपासून आर्थिक मदत आणि खूनानंतर साहिल उर्फ मुन्ना पोळेकरने दिलेला निरोप असा तपास करत मास्टर माईंडच्या दिशेने तपास सुरू केला होता. त्यानंतर रविवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी पनवेल व वाशीदरम्यान छापेमारीकरत गुंड विठ्ठल शेलार याच्यासह 10 जणांना ताब्यात घेतले. दिवसभर त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर यातील विठ्ठल शेलारसह तिघांना अटक केली आहे. आता सात जणांकडे पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत जुने वाद त्यासोबतच जमीनीचे व्यवहार व आर्थिक वादातून असणारे वाद यातून विठ्ठल शेलार याचा या खूनाच्या कटात सहभाग असल्याचे उघडकीस आणले आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. आता या खुनाचा नेमका मास्टर माईंड विठ्ठल शेलार की आणखी कोणी आहे. तसेच या खूनात आणखी कोण सामील आहे का, याबाबत गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे.












