पुणे : जामिनदार म्हणून दोघांच्या बनावट सह्या करुन पतसंस्थेकडून ७७ लाखांचे कर्ज घेतले. मात्र, घेतलेले कर्ज परतफेड न करता दोघांची फसवणूक केली. हा प्रकार सदाशिव पेठेतील निनाद नागरी पतसंस्थेत डिसेंबर २०१९ ते २५ जानेवारी २०२४ दरम्यान घडला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष व भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी व त्यांचा मुलगा, पतसंस्थेचे कोषाध्यक्ष व सचिव यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत तानाजी दिनकर मोरे (वय-४२ रा. तुकाईनगर, वडगाव बु., पुणे) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन श्रीराम गॅस एजन्सीचे मयुरेश उदय जोशी (वय-३८), भाजपचे माजी नगरसेवक उदय त्र्यंबक जोशी (वय-६५ दोघे रा. सुवर्णनगरी सोसायटी, पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष आनंदनगर, सिंहगड रोड पुणे), कोषाध्यक्ष रामलिंग शिवगणे (वय-६६ रा. बालाजीनगर, धनकवडी), सचिव अशोक कुलकर्णी (वय-७२ रा. सनसिटी सिंहगड रोड, पुणे) यांच्यावर भा.दं,वि. कलम ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ नुसार गुन्हा दाखल केला.
उदय जोशी आणि त्यांचा मुलगा मयुरेश यांची श्रीराम गॅस एजन्सी आहे.
गॅस एजन्सीत पैसे गुंतविल्यास चांगला परतावा देण्यच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी यापूर्वी जोशी यांच्यासह मुलाविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. मयुरेशने सदाशिव पेठेतील निनाद नागरी पतसंस्थेतून कर्ज घेतले होते. तक्रारदार तानाजी मोरे व एका महिलेला कर्जप्रकरणाची कोणतीही माहिती न देता कर्जप्रकरणावर त्यांची बनावट स्वाक्षरी केली. पतसंस्थेतील पदाधिकारी उदय जोशी, रामलिंग शिवगणे, अशोक कुलकर्णी, तसेच संचालक मंडळातील अन्य संचालकांशी संगनमत करून ७७ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. कर्जप्रकरणाची माहिती मोरे व महिलेला न देता फसवणूक केली, तसेत कर्जाची परतफेड केली नाही. पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक नानेकर करीत आहेत.












