भारतीय जनता पक्षाला निवडणुकांमध्ये मिळालेले यश हे त्यांच्या पक्षाचे नाही, तर त्यांनी ईव्हीएम मशीन मध्ये केलेल्या घोटाळ्याचे यश आहे. ईव्हीएम चा पूर्वी मी सुद्धा समर्थक होतो, परंतु मध्य प्रदेश मध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर माजी खात्री पटली आहे की ईव्हीएम मध्ये भारतीय जनता पक्षाने निश्चितच घोटाळा केला आहे, आणि त्यामुळेच त्यांना यश मिळाले आहे. जर ईव्हीएम नसेल तर भाजप देशांमधील एकही ग्रामपंचायत निवडणूक जिंकू शकत नाही, असा विश्वास शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
संजय राऊत म्हणाले, राजकारण करायचे असेल तर मनामध्ये भीती बाळगून चालत नाही. भीती खुंटीला टांगल्याशिवाय राजकारणामध्ये यशस्वी होता येत नाही. राजकारणामध्ये विरोधकांचाही सन्मान केला पाहिजे, ही शिकवण बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला दिली. परंतु सध्या मात्र विरोधकांना संपवण्याचे कटकारस्थान महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सुरू आहे. या संघर्षामध्ये शिवसेना कायम लढत राहणार आहे. माझ्यावर शिवसेना संपवण्याचे आरोप केले जातात. परंतु जे आरोप करतात तेच लोक शिवसेना सोडून जातात आणि आम्ही मात्र शिवसेना वाचवण्याचे काम गेल्या ४० वर्षांपासून करत आहोत आणि यापुढेही करत राहणार आहोत.
ते पुढे म्हणाले, देशाच्या संसदेमध्ये गेल्या २२ वर्षांपासून मी खासदार म्हणून काम करत आहे. परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये संसद लोकशाहीचे मंदिर राहिलेले नाही, तर त्या ठिकाणी केवळ आरडाओरडा करून एकमेकांचे गळे दाबण्याचे आणि लोकशाही संपवण्याचे काम सुरू आहे. देशामध्ये बेरोजगारी वाढत आहे. भ्रष्टाचार वाढत आहे, परंतु या संबंधात बोलणाऱ्यांना तुरुंगामध्ये टाकले जाते.
महाराष्ट्र खड्ड्यात घालणारेच आज सत्तेमध्ये बसले आहे, अशा लोकांवर थुंकायचे नाही तर काय फुले उधळायची का? कोणी एकेकाळी महाराष्ट्र दिल्लीमध्ये ताठ मान करून वावरत होता. परंतु आज मात्र या भ्रष्टाचारी आणि बेईमान लोकांमुळे महाराष्ट्राची मान संपूर्ण देशांमध्ये शरमेने खाली गेली आहे. त्यांच्या विरोधातील लढा शिवसेना कायम सुरू ठेवणार आहे असा निर्धार संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.












