ऐंद्रयाभिषेक हा सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्रांतीचे सार होता. दंडनीती व राजनीतीच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या वैचारिकतेला दिलेला आयाम होता. वारकरी संप्रदायाला एक धर्मपंथ म्हणून मिळालेला राजाश्रय होता. महिला, शूद्र आणि शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाचा हा जाहिरनामा होता… आणि या क्रांतीचा ६ जून १६७४ हा साक्षीदार असलेला दिवस होता.
घरात आणि अंगाखांदयावर कुत्रीं – मांजरं खेळवल्यानं ना घरं विटाळली जातं होती ना माणसं बाटल्या जात होती. गुरं-ढोरांना स्पर्ष केल्यानं पापं धुतली जात होती आणि त्यांना चारा खाऊ घातल्यानं तर खुप सारं पुण्य पदरी पडायचं. पशुपक्ष्यांच्याठायी देवत्व पाहणारा धर्म, समाजातील एका मोठया मानवी वर्गाला माणूसं मानण्यास तयार तयार नव्हता.मनुष्यत्व त्यांच्यासाठी शापं ठरलं होतं. अधिकार तर सोडाचं पण त्यांच्या नुसत्या स्पर्षानं माणसं बाटल्या जायची. गाव व मंदिराला त्यांचा वारासुध्दा मान्य नव्हता. त्यांचा गावातील प्रवेश हा धर्मनिषिध्द होता. समाजात अस्पृष्यता सर्वोच्च शिखरावर असताना एक सरदारपुत्र या सर्व धर्मानं तुच्छ मानलेल्या अठरापगड जातींना एकत्र करतो. त्यांना मानाचे पान बहाल करतं, त्यांच्या साहय्याने स्वराज्याची स्थापना करतो. हे शिवाजी राजांचे कार्य प्रचलित धर्माला छेद देणारे होते.
तो अजरामर राजा आज हिंदवी स्वराज्य संस्थापक, हिंदू धर्म रक्षक सांगितल्या जातो. ज्याला स्वतःचे क्षत्रियत्व सिध्द करण्यासाठी धर्मव्यवस्थेशी संघर्ष करावा लागला होता. सत्य सांगायचे झाले तर शिवाजी राजा हा धर्मरक्षक नव्हे तर मानवीमूल्यांचा रक्षणकर्ता होता. मानवीयतेच्या धर्माचा पालनकर्ता महापुरूष होता. नाही रे.. वर्गाचा कैवारी होता.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम धर्म मान्यता पावलेली अस्पृष्यता लाथाडून टाकली होती. रायगड देशातील एकमेव राजधानी होती, जी अस्पृष्यता मानतं नव्हती. जो धर्म माणसाला माणूस म्हणण्यास राजी नव्हता, त्या गांजलेल्या मानवांना छत्रपतींनी सन्मान प्राप्त करून दिला. यामुळेच छत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याला समाज मान्यता लाभली होती, पण धर्ममान्यता नव्हती, हे वास्तव आहे. महाराज खरोखर हिंदू धर्म रक्षक होते, हिंदवी स्वराज्य संस्थापक होते तर मग त्यांचा राज्याभिषेक धर्मज्ञानी मंडळींनी का नाकारला होता. याचा सरळ अर्थ हा प्रचलीत धर्म छत्रपती शिवाजी महाराजांना क्षत्रिय म्हणून मान्यता देण्यास तयार नव्हता. तो धर्म आज छत्रपतींना केवळ हिंदूचा रक्षणकर्ता सांगत असेल, तर यात सत्यता किती समजावी? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
याचा अर्थ असा नाही की महाराज हे धार्मिक नव्हते. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात धार्मिकतेला महत्वाचे स्थान होते. राजांना, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ।। हा वारकरी संप्रदायाचा धर्म अतिप्रिय होता. संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा पाया घालून प्रचलित धर्मातील अज्ञानमूलक अंधश्रध्दा आणि अस्पृष्यतेच्या विरोधात बंडाचा झेंडा उभारला होता. तीच वारकरी संप्रदायाची भगवी पताका आपल्या खांद्यावर घेत, सोळाव्या शतकांत धर्मवृक्षावर वाढलेली कर्मकांडी बांडगूळं काढून फेकतं, धर्मगंगेचा प्रवाह शुध्द करण्याचे कार्य संत तुकाराम महाराजांनी सक्षमपणे केलं. वारकरी संप्रदायाच्या त्यागाचे प्रतीक असलेल्या भगव्या झेंड्याला राजांनी स्वराज्याचे निशाण बनवले.
धर्म आपल्या क्षत्रियत्वाला मान्यता देत नाही. याची राजांना काहीच खंत वाटली नाही, असे आपल्याला म्हणता येईल काय..? यावर राजांचा खाजगी चिटणीस असलेल्या कायस्थ बाळाजी आवजीने मार्ग काढला.त्याने पहिले काम असे केले की त्याने काशीहून गागा भटाला आणण्यासाठी १) केशव भट, २) भालचंद्र भट ३) सोमनाथ भट हे तीन ब्राह्मण काशीला पाठविले. शिवाजी राजांच्या एकंदर घराण्याची व पुढे होणाऱ्या राज्याभिषेकाची संपूर्ण रुपरेषा या ब्राह्मणांजवळ गागा भटाला पाठविण्यात आली होती. यावर गागा भटाने काय केले ? शिवाजी हा शूद्र आहे म्हणून तो राज्याभिषेकाला पात्र नाही आणि म्हणून त्याचे आमंत्रण स्वीकारण्यास आपण तयार नाही अशा अर्थाने पत्र लिहून ते पत्र त्या तीन ब्राह्मण दूतांच्या स्वाधीन करुन गागा भटाने त्यांना काशीहून परत पाठविले. यानंतर जे दुसरे कृत्य बाळाजीने केले ते शिवाजी क्षत्रिय आहे हे सिद्ध करणारे पुरावे गोळा करणे. एक वंशावळ मिळविण्यात बाळाजीला यश आले. परंतु यावेळी गागा भटाकडे एक कायस्थ दूत पाठवला त्याचे नाव निळो येसाजी आणि यावर गागा भटांनी आपली संमती दाखवली. यात ब्राह्मण व कायस्थ सख्य त्याकाळी कसे होते, हे आपल्या लक्षात येईल.
राज्याभिषेकावेळी किती दक्षिणा वाटण्यात आली ? तिची किमत दीड लक्ष होन ( एक होन म्हणजे तीन रुपये) झाली होती. १३ मे ते १३ जून या काळात ऑक्झेन्डेन यांनी जी आपली रोजनिशी लिहिली होती तीत तो सुद्धा असे म्हणतो की शिवाजीचे सोन्याबरोबर वजन केले तेव्हा ते वजन १६००० होनांचे झाले हे १६००० व दुसरे एक लक्ष होन यांची दक्षिणा ब्राह्मणांमध्ये वाटण्यात आली. ऑक्झेन्डेन पुढे लिहितो की व्रात्यस्तोमाचा विधी करण्यासाठी गागा भटाला ७००० हो आणि त्याच्या बाजूच्या ब्राह्मणांना १७००० देण्यात आले. ५ जूनला शिवाजीने पवित्र गंगेच्या पाण्याची अंघोळ केली. तेव्हा जे ब्राह्मण आघोळीच्या ठीकाणी हजर होते त्यांना प्रत्येकी १०० होन देण्यात आले. गागा भटाला जी रक्कम देण्यात आली होती ती रक्कम म्हणजे पुरोहिताला देण्याला योग्य अशी दक्षिणा होती यापेक्षा त्या रकमेला दुसरा अर्थ नाही असे होते काय ? सभासदाने असे लिहून ठेवले आहे की समांरभाचा एकंदर खर्च एक कोटी बेचाळीस लक्ष होन अथवा ४२६ लक्ष रुपये झाला होता. तेव्हा प्रत्येक ब्राह्मणाला तीन ते पाच रुपये मिळाले आणि बाकीच्याना स्त्रिया आणि लहान मुले यांना अनुक्रमे दोन रुपये व एक रुपया अशी दक्षिणा मिळाली. गागा भटाला व्रात्यस्तोमाचा विधी करण्यासाठी किती रक्कम मिळाली होती तर ७००० होन पहा एक होन म्हणजे २.७ ग्रॅम सोन्याचं नाणं. याचा अर्थ एकटया गागा भटांना जवळ जवळ १९ किलो सोनं बक्षिसीच्या स्वरूपात देण्यातं आलं होतं. त्याची आजच्या बाजार मूल्याप्रमाणे किंमत धरायची झाल्यास ११ ते १२कोटी रूपये मूल्य होते. मग ही दक्षिणा होती का धर्म मान्यता मिळविण्यासाठी केलेली तडजोड होती ? ही धर्म मान्यता आजही पुराणोक्त अथवा वेदोक्त प्रश्नांच्या रूपात अधूनमधून डोकं वर काढतांन दिसून येतेच… अस्पृष्यता निर्मूलनाचे कार्य करणारा पहिला राजा व आदर्श गुरू म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांच्यासाठी समाजकार्याची प्रेरणास्रोत ठरले. म्हणूनच ६ जूनचा राज्याभिषेक हा मानवीयतेचा जाहिरनामा ठरतो.
शिवाजी महाराजांस ऐंद्रयाभिषेक












