पुणे : भारत भारती, राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य करणाऱ्या संस्थेने 28 जानेवारी रोजी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याचे स्मरण आणि 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष राष्ट्रीय एकात्मता शोभायात्रेचे आयोजन केले होते. रविवार 28 जानेवारी रोजी दुपारी 4 ते 8 वाजेपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा मार्ग एस.पी. कॉलेज ते अभिनव चौक ते बेलबाग चौक ते अलका टॉकीज ते एसपी कॉलेज मैदान असा नियोजित होता.
या भव्य कार्यक्रमात सुमारे ६० रथांचे प्रदर्शन झाले आणि पुण्यातील १०,००० नागरिकांनी सहभाग घेतला. सध्या पुण्यात राहणारे पण मूळचे 20 राज्यांतील लोक, विद्यार्थी आणि 15 हून अधिक शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी आणि 20 हून अधिक धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी भारताप्रती आपले प्रेम आणि आपुलकी दाखवण्यासाठी मिरवणुकीत सहभाग नोंदवला. विविधतेत एकतेचा संदेश देण्यासाठी भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा दाखवणारे विविध चित्ररथ पुण्यातील गजबजलेले रस्त्यावर फिरले.
मराठवाडा मित्र मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाने महाराष्ट्रातील संत परंपरेचा विषय दर्शविणारा चित्ररथ घेऊन शोभा यात्रेत उत्साहाने सहभाग घेतला. या प्रसंगी 50 पेक्षा जास्त एन.एस.एस. स्वयंसेवक हे महाराष्ट्रातील विविध देव-संतांच्या वेशभूषेत आले होते जसे की विठ्ठल-रुक्मिणी, ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताई, संत नामदेव इत्यादी. तसेच वारकरी वेशात आलेल्या आळंदीच्या बालचमुंनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांबरोबर ठेका धरुन सर्व वातावरण भक्ती मय करुन दिले.
संतांचे नाम स्मरण करत आणि विविध संतांचे अभंग सादर करत महाविद्यालयाच्या अध्यापकांनी सुद्धा शोभा यात्रेत उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवला. या प्रसंगी महाविद्यालचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार सर यांनी स्वतः यात्रेत सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. तसेच प्रा. डॉ. अश्विनी कुलकर्णी, प्रा. सुशील गंगणे, प्रा. प्रवीण कड, प्रा. डॉ. प्रमोद सकपाळ, प्रा. तुकाराम पाटील, प्रा. डॉ. ओमप्रकाश अजबे, प्रा. पंकज घोरपडे, व प्रा. डॉ. प्रणिता रासकर, प्रा. डॉ.कल्पना वैद्य यांनी यात्रेत सहभाग घेऊन एकतेचा संदेश दिला. मा. प्रा. भाऊसाहेब जी. जाधव, कार्यवाहक अध्यक्ष, मराठवाडा मित्रमंडळ, पुणे यांच्या संकल्पनेतुन या चित्ररथाचे आयोजन महाविद्यालयाकडून करण्यात आले व त्यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनातुनच हे चित्र साकार झाले.












