देहू नगरपंचायतीच्या ४६ कोटी ८४ लाख ७३ हजार ९३३ रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. देहू नगरपंचायतीची गुरुवारी (दि. १५) विशेष सभा पार पडली. या सभेत अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. यावर्षी नगरपंचायतीच्या महसुलात सुमारे १५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
नगराध्यक्षा पूजा दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. यावेळी मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, उपनगराध्यक्ष सुधीर काळोखे, गटनेते योगेश परंडवाल, सदस्य योगेश काळोखे, मयूर टिळेकर, मयूर शिवशरण, प्रदीप परंडवाल, मीना कुऱ्हाडे, पूनम काळोखे उपस्थित होते.आगामी आर्थिक वर्षांत १७ कोटी ५८ लाख २९ हजार रुपये महसुली आणि भांडवली उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. विकासकामांच्या अनुदानापोटी २९ कोटी २४ लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे. महसुली खर्च १८ कोटी ३६ लाख ६५ हजार आणि विकास कामांच्या भांडवली खर्चासाठी २८ कोटी ४३ लाख ५० हजार रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
४३ कोटी रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. यामुळे देहूचा पाणी प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. भुयारी गटार योजनेसाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.











