आज मराठी भाषा गौरव दिन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचे महाराष्ट्राच्या साहित्यामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगादानामुळे महाराष्ट्र शासानाने 21 जानेवारी 2013 मध्ये या 27 फेब्रुवारा या त्यांच्या वाढदिवसाच्या ऐतिहासिक दिवसाला मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केले. अलीकडे कोणताही सण हा सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्याशिवाय पूर्ण होत नाही, मग आज आपल्या भाषेला समर्पित या दिवसाच्या खास शुभेच्छा तुमच्या प्रियजनांना नक्की द्या.
कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्तानं 27 फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र सरकारनं घेतला. परंतु, याच दिवसाला अनेक जण ‘मराठी राजभाषा दिन’ असंही म्हणतात. पण ‘मराठी भाषा गौरव दिवस’ आणि ‘मराठी राजभाषा दिवस’ हे दोन्ही वेगवेगळे आहेत.
मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. कुसुमाग्रज हे मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजवणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि समीक्षक होते. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्द-कलेवरचं प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्य आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीनं त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केलं. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावानं त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचं आकलन करायला प्रवृत्त केलं. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झालं आहे.
अक्षरबाग (1990), किनारा(1952), चाफा(1998), छंदोमयी (1982), जाईचा कुंज (1936), जीवन लहरी(1933), थांब सहेली (2002), पांथेय (1989), प्रवासी पक्षी (1989), मराठी माती (1960) ही कुसुमाग्रजांचे गाजलेले कवितासंग्रह. तर, ऑथेल्लो, आनंद, आमचं नाव बाबुराव, एक होती वाघीण, किमयागार, कैकेयी, नटसम्राट ही त्यांची गाजलेली नाटकं. कल्पनेच्या तीरावर, जान्हवी, वैष्णव या कादंबऱ्याही कुसुमाग्रजांनी लिहिल्यात.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
सर्व मराठी बांधवांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!












