बारामती नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येत्या शनिवारी बारामती दौऱ्यावर असणार आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बारामतीत एवढा मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. यादरम्यान एक मोठी माहिती समोर येत आहे.
बारामतीत येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारांनी फोन करून त्यांच्या घरी जेवणाचे निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विनंतीवरून येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांचे निमंत्रण स्वीकारणार का हे पाहावं लागेल.
बारामतीत येत्या शनिवारी शासकीय कार्यक्रम असतानाही, राज्यसभेचे खासदार असणाऱ्या शरद पवारांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलं नाही. आता शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या घरी जेवणाचे आमंत्रण दिलं असताना ते आमंत्रण स्वीकारलं जाईल का हे पाहावं लागेल.बारामतीमध्ये शरद पवारांचे घर असल्याने आणि राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बारामतीत येणार असल्याने हे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे.












