उद्धव ठाकरे यांचा सोबत असलेले आमदार आता त्यांच्या मनातील खतखत बोलून दाखवत आहे.शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव यांनी चिपळून येथे रविवारी ( 10 मार्च ) कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी भास्कर जाधवांनी मनातील सल बोलून दाखवत शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. यावरून भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी भास्कर जाधवांना डिवचलं आहे. “उद्धव ठाकरे वापरून घेणार, याची कल्पना तुम्हाला आली असेल. तुम्हाला बाहेर कोणी किंमत देत नाही. आता तुमचे डोळे उघडतील. यापुढे रडगाण्याचा कार्यक्रम बंद करा, असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे.
निलेश राणे म्हणाले, “चिपळूण येथील सभेत भास्कर जाधवांनी जपून शब्द वापरले, याचा मला आनंद आहे. आमची हीच अपेक्षा आहे. आम्हाला वाईट शब्द वापरायला आवडत नाही. पण, ज्यांची संस्कृती जशी, त्याला त्याच भाषेत उत्तर देतो.भास्कर जाधवांना सहकाऱ्यांवर टीका करावी लागली. हे तुमच्याच बाबतीत का घडतं? याचा विचार करा. मी चिपळूणमध्ये राहत नाही. तरी चिपळूणमधील अनेक सहकारी सावलीसारखं माझ्याबरोबर राहतात. तुम्ही चिपळूणमध्ये असताना तुमचे सहकारी तुम्हाला सोडून जातात. त्यामुळे दुसऱ्यांवर टीका करून काही होत नाही. तुम्ही लोकांना कसं वेठीस धरलं, कोणते शब्द वापरले, याचा विचार करा,असा सल्ला राणेंनी जाधवांना दिला.
चिपळूण-रत्नागिरीतील लोकांसमोर खोटं बोलणं, या वयात तरी जाधवांनी बंद करावं. लोकांना खरं खोटं सर्व समजतं. यानिमित्तानं एवढंच सांगतो, उद्धव ठाकरे तुम्हाला वापरून घेणार, याची कल्पना आली असेल. तुम्हाला बाहेर कोणी किंमत देत नाही. आता तुमचे डोळे उघडतील. यापुढे हा रडगाणे कार्यक्रम बंद करा. आमच्यासारखी अनेक लोक तुमच्याकडे पूर्वी आदरानं बघत होती. पण, आज अनेकजण तुम्हाला सोडून गेली आहेत,” असंही निलेश राणेंनी म्हटलं.












