पिंपरी : विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या एका तरुणाला पिंपरी पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून एक पिस्टल, एक जिवंत काडतुस असा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मॅग्जीन चौकातील सार्वजनिक रोडच्या कडेला करण्यात आली.
याबाबत पोलीस शिपाई विनोद आबासाहेब वीर यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी ब्रह्मदेव माधव लटपटे (वय-२३ रा. इंद्रायणीनगर, आळंदी देवाची) याच्यावर आर्म ॲक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथक दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. मॅग्जीन चौकातील आळंदीकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडच्या कडेला एकजण थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची
माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपी लटपटे याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेऊन एक लोखंडी पिस्टल व एक काडतुस असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.












