पिंपरी : फुरसुंगी गावच्या उरुसामध्ये मानलेल्या बहिणीची छेड काढल्यावरुन वाद झाले. याचा राग मनात धरुन पाच जणांच्या टोळक्याने तरुणाला व मानलेल्या बहिणीला धारदार हत्याराने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.१२) फुरसुंगी भागातील खंडोबा माळ येथे घडला आहे.
याबाबत सुमेध संदिप गवई (वय-१७ रा. खंडोबा माळ, फुरसुंगी गाव) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अमोल गोविंद गायकवाड (वय-२०), नितीन धोंडीबा मोरे (वय-२२), अनिरुद्ध महादेव मोरे (वय-२० सर्व रा. खंडोबा माळ, फुरसुंगी गाव), आकाश रामहरी हाजगुडे (वय-२२ रा. मोगले वस्ती, लोणी काळभोर) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर धरम निवृत्ती गायकवाड (वय-१९ रा. खंडोबा माळ, फुरुसुंगी) याच्यावर भा.दं.वि. कलम ३०७, १४३, १४७, १४९, महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म ऍक्ट, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी याच्या मानलेल्या बहिणीची फुरसुंगी गावच्या उरुसामध्ये छेड काढली होती. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला होता. मंगळवारी फिर्यादी व त्याचा मित्र स्वप्नील भालेराव खंडोबा माळ रेल्वे गेट जवळ चहा पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी धारदार हत्यारांनी फिर्यादी व त्याच्या मानलेल्या बहिणीला मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी तेथून जाताना हातातील धारदार शस्त्रे हवेत फिरवुन दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश गिते करीत आहेत.












