फर्ग्युसन रोडवरील प्रसिद्ध हॉटेल वैशालीच्या पॉवर ऑफ अॅटर्नीला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वजित विनायकराव जाधव (वय 38), अभिजित विनायकराव जाधव (वय 40), विनायकराव जाधव (वय 65), वैशाली विनायकराव जाधव (वय 60) अशी आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी विवाहितेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2018 ते 18 जून 2023 या कालावधीत सुरू होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये फिर्यादीचा पती विश्वजित याने फिर्यादीला घोले रोड येथील त्यांच्या घरी दारू आणि अंमली पदार्थ देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. लग्नानंतर संगनमताने मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला. पिस्तुलाचा धाक दाखवून विश्वजित याने फिर्यादीकडून बळजबरीने मुखत्यारपत्र घेतले आणि फिर्यादीच्या वडिलांचे वैशाली हॉटेल आपल्या नावे केले.
कंपनीच्या नावावर खरेदी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या चार गाड्या परस्पर विकून फिर्यादीची फसवणूक केली. फिर्यादीत असे म्हटले आहे की, तो व त्याचा भाऊ लग्नाचे दागिने व फिर्यादीचे एक कोटी ७० लाख रुपये किमतीचे साहित्य व दोन कार वापरत आहेत. शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक विक्रम गौड पुढील तपास करत आहेत.












