पुणे | प्रतिनिधी
पिंपरी, दि.२० : विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेने विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा सुरू केली होती. कोविड काळात ही बस सेवा बंद होती.आता पुन्हा एकदा महापालिकेने रावेत, पुनवळे, किवळे येथील बांधकाम कामगार आणि मजुरांच्या मुलांना त्यांच्या घरापासून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावरील शाळांमध्ये बसने जाण्याची सेवा मोफत केली आहे. सहयोगी फाउंडेशन व इतर संस्थांच्या पाठपुराव्यामुळे ही बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
बससेवा सुरू करण्याबाबत सहयोगी फाऊंडेशनच्या अध्यक्षांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह महापालिका आयुक्तांना सांगितले होते. विद्यार्थ्यांना कोणत्याही त्रासाशिवाय दररोज शाळेत जाता यावे यासाठी मोफत बससेवा देण्याचा मुद्दा रुद्रवार यांनी उपस्थित केला.
रावेत, पुनावळे, किवळे परिसरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या महापालिकेच्या शाळेत जावे लागते. यातील बहुतांश विद्यार्थी वंचित कुटुंबातील आहेत. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेने विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा सुरू केली.
गतवर्षी बससेवा उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नव्हते. अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले. मुलांच्या अपहरणाच्या घटना लक्षात घेऊन अनेक पालक आपल्या मुलांना एकट्याने शाळेत जाण्याचे धाडस करत नाहीत. बससेवा सुरू झाल्यास मुलांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी पालिकेने मोफत बससेवा सुरू केल्याचे नागरीक प्राधिकरणाने सांगितले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सुरू झालेल्या या बस सुविधेमुळे वाडा झोपडपट्टीतील अनेक शाळाबाह्य मुलांना आता शाळेत जाता येणार आहे.












