पुणे : मुंढवा पोलिसांनी दुचाकी आणि जबरी मोबाईल चोरणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 30 जून) मुंढवा रेल्वे ब्रिज खाली केली. ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांकडून एकूण 2 लाख 28 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे.
सदर ताब्यात घेतलेल्या मुलांकडून ५ वाहन चोरीचे आणि २ जबरी चोरीचे असे एकूण ७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना अंमलदार दिनेश राणे व स्वप्नील रासकर यांना माहिती मिळाली की, मुंढवा रेल्वे ब्रीज खाली चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी दोन अल्पवयीन मुले येणार आहेत. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन मुलांची चौकशी केली. त्यांनी चौकशी दरम्यान दुचाकी चोरल्याची तसेच मोबाईलची चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून लपवून ठेवलेल्या चोरीच्या पाच दुचाकी, 6 मोबाईल, आणि रोख रक्कम, जप्त केले गेले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलीस उपायुक्त विक्रम देशमुख , सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक गुन्हे प्रदिप काकडे , सहायक पोलीस निरीक्षक संदिप जोरे, पोलीस अंमलदार दिनेश राणे, वैभव मोरे, महेश पाठक, राहुल मोरे, स्वप्नील रासकर, सचिन पाटील या पथकाने केली आहे.
दुचाकी आणि मोबाईल चोरणारी अल्पवयीन मुले मुंढवा पोलिसांच्या ताब्यात












