पुणे | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड दि.१३ : पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने त्यांच्या हद्दीत वैध परवान्याशिवाय चालणाऱ्या दोन खासगी शाळांवर गुन्हे दाखल केले आहेत. हिंजवडीतील ब्लिस एडिफाय इंटरनॅशनल स्कूल आणि रुडिमेंट इंटरनॅशनल स्कूल या दोन शाळांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद सदस्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शाळेला शासनाची वैध परवानगी नसून, ते वर्षभराहून अधिक काळ बेकायदेशीरपणे शाळा चालवत होते. शिक्षण विभागाने पाहणी केली असता विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन पालकांकडून भरमसाठ फी आकारली जात होती, अशी माहिती समोर आली आहे.
ब्लिस एडिफाय इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता 1 ली ते 8 वीच्या वर्गात 116 मुले शिकत होती. रुडिमेंट इंटरनॅशनल स्कूलबद्दल तपशीलवार माहितीची प्रतीक्षा आहे.
शाळांचे मालक आणि मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.












