पुणे प्रतिनिधी
पुणे : ग्वाल्हेर-आग्रा घराण्याचे आश्वासक युवा गायक विशाल मोघे यांची विविध राग वैशिष्ट्यांनी नटलेली अनोखी मैफल रसिकांना अनुभवायला मिळाली. निमित्त होते कै. मोरेश्वर यशवंत कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित संगीत मैफलीचे!
युवा कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांना स्वरमंच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत कलासक्त कल्चरल फाउंडेशनतर्फे मंगळवारी बेडेकर गणपती मंदिरात या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
मोघे यांनी मैफलीची सुरुवात राग धनाश्रीने केली. हा राग त्यांनी खमाज अंगाने सादर करत ‘रे म्हारो राजेंद्र मोह्ये मोह्ये रे’ ही पारंपरिक बंदिश सादर केली. त्यानंदर द्रुत लयीतील ‘तेरो ध्यान धरत दिन रैना’ ही रचना सादर केली.
गौडमल्हार रागातील पारंपरिक बंदिश तीन तालात सादर केली जाते; परंतु गुरू पंडित अरूण कशाळकर यांनी ध्रुपदमध्ये बांधलेल्या गौड मल्हार रागातील ‘मान न करो री गोरी’ या बंदिशीसह ‘झूम झूम बरसे बदरवा’ ही रचना सादर करत विशाल मोघे यांनी गुरूंकडून मिळालेल्या सांगितीक वारशाची झलक दाखविली.
झिंजोटी रागातील ‘महादेव शंकर जटाजूट’ ही पारंपरिक रचना ताकदीने सादर करून त्यांनी रसिकांची दाद मिळविली. ‘देखो मोरी गगरी छिन ली.. चुनरी गयी सगरी भिगी’ ही गुरूंनी रचलेली द्रुत तालातील बंदिश रसिकांना विशेष भावली. रसिकांच्या आग्रहास्तव मोघे यांनी ‘लालवाला जोबन‘ या भैरवीतील रचनेसह टप्पा सादर करून मैफलीची सांगता केली.
विशाल मोघे यांना प्रणव गुरव (तबला), प्रवीण कासलीकर (संवादिनी) आणि केयूर कुरूलकर, होनराज मावळे (तानपुरा-सहगायन) यांनी साथसंगत केली.
संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग कुलकर्णी म्हणाले, भविष्यात संगीतविषयक चर्चासत्रे, परिसंवादासह युवा कलाकारांना शिष्यवृत्ती देण्याचा मानस असून नवीन कलाकारांना ऐकण्याची संधी रसिकांना मिळावी या उद्देशाने ‘कलासक्त’ची स्थापना करण्यात आली आहे.
संस्थेच्या सहसंस्थापक विनिता आपटे यांनी कलाकारांचे स्वागत करून संस्कृतीसंपन्न समाज निर्मितीसाठी कलासक्त संस्था प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
फोटो ओळ : कलासक्त कल्चरल फाउंडेशन आयोजित संगीत मैफलीत (डावीकडून) प्रणव गुरव, होनराज मावळे, विशाल मोघे, केयूर कुरूलकर, प्रवीण कासलीकर.












